G-20 Summit : तीन दिवसांच्या जी-20 परिषदेत भारताच्या हाती नेमकं काय लागलं?

0

G-20 Summit : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या जी 20 शिखर परिषदेकडे(G-20 Summit) सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, त्या जी 20 ची अखेर यशस्वी सांगता झाली आहे. या तीन दिवसांच्या शिखर परिषदेत भारताच्या हाती नेमकं काय लागलं आहे.

कुठल्या गोष्टी ऐतिहासिक ठरल्या आणि कुठल्या गोष्टींमुळे वाद निर्माण झाले.
45 पेक्षा अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख..पंतप्रधान मोदींच्या तीन दिवसांत 15 द्विपक्षीय बैठका…रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वसहमतीचं दिल्ली घोषणापत्र…भारत- अमेरिका- सौदी अरेबिया दरम्यान महत्वाचे करार…अशा अनेक कारणांमुळे भारतात झालेली जी 20 शिखर परिषद महत्वाची ठरली. दोन दिवसांच्या या शिखर परिषदेची सुरुवात मुळात ऐतिहासिक घोषणेनं झाली . आफ्रिकन युनियनचा समावेश जी 20 मध्ये होतोय ही घोषणा बैठकीच्या पहिल्याच मिनिटात पंतप्रधान मोदींनी केली. जगातल्या ज्या राष्ट्रांना आपला आवाज ऐकला जात नाही असं वाटतं, त्यांना सोबत घेण्याची गरज असल्याची भूमिका मांडली. सोबतच सबका साथ सबका विकास या देशात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेचा उल्लेखही त्यांना या महत्वपूर्ण पावलाशी जोडला.

दिल्लीच्या प्रगती मैदानमधल्या भारतमंडपमध्ये ही महत्वाची परिषद पार पडली. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ज्या द्विपक्षीय बैठका केल्या. त्यात अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यासोबत झालेल्या बैठका अधिक महत्वाच्या. युरोप- मिडल इस्ट- भारत अशी रेल्वे आणि बंदर कनेक्टिव्हिटी निर्माण करणाऱ्या महत्वाच्या कराराची घोषणाही यावेळी झाली.

जी 20 च्या या शिखर परिषदेत काल राजघाटावर जे चित्र दिसलं तेही अनोखं होतं. या शक्तीशाली आंतरराष्ट्रीय समूहाचे सगळे दिग्गज महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक झाले. रोज उठून गांधींविरोधात गरळ ओकणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक होती. शिवाय देशातल्या राजकारणात गांधींना कितीही पुसण्याचा प्रयत्न झाला तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात मात्र याच नावाचा आधार घ्यावा लागतो हेही त्यामुळे स्पष्ट झालं.

या जी 20 परिषदेत आणखी एका गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे मोदींच्या न झालेल्या पत्रकार परिषदेची..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जिथे जातात, द्विपक्षीय बैठका करतात त्यानंतर तिथल्या मीडियाला सामोरे जातात. त्यामुळे भारतात पण मोदींसोबतच्या बैठकीनंतर अशा संयुक्त पत्रकार परिषदेची मागणी व्हाईट हाऊसकडून होत होती. पण भारताकडून काही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जी 20 बैठक संपवून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्हिएतनाममध्ये पोहचले, तिथे मात्र त्यांनी यावर भाष्य केलं. मोदींसोबत बोलताना भारतातल्या मानवी हक्क अधिकारांचा, माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आपण उल्लेख केल्याचं त्यांनी म्हटलं.

काल बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांच्या दालनाला भेट दिली. पण केवळ अभिवादन करण्यासाठीच..या जी 20 कव्हरेजबद्दल त्यांनी सर्व माध्यमांचे आभार मानले. जी 20 चं यजमान पद प्रथमच भारताकडे आलं होतं. आता पुढच्या वर्षी ते ब्राझीलकडे असणार आहे. या निमित्तानं आंतरराष्ट्रीय नेत्यांची, धोरणांची चर्चा तर झाली. पण आता प्रत्यक्ष त्यातल्या शब्दांवर किती काम आंतरराष्ट्रीय जगत करतं त्यातूनच त्यांचं महत्व कळेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here