रत्नागिरी : गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन

0

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक उत्सव मंडळांनी विजेच्या बाबतीत अपघात होऊ नयेत, यासाठी दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

महावितरणकडून सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज आकारणी करण्यात येत आहे. तेव्हा मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या महावितरण कार्यालयास भेट द्यावी. विद्युत निरीक्षक यांची विद्युतसंच मांडणी परवानगी आवश्यक आहे.

महावितरणकडून विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी 7875765018 या क्रमांकावर संपर्क साधावा.

संभाव्य विद्युत अपघातामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्याकरिता विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उत्सवासाठी मंडप उभारताना विद्युत रोषणाई, देखावे साकारताना, गणेशमूर्ती आणताना विद्युत यंत्रणेतील विद्युतवाहिन्या, वितरण रोहित्रे, विद्युतखांबास ताण दिलेली तार, भूमिगत वाहिनींचे फिडर पिलर आदींपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.

विद्युतवाहिन्यांखाली मंडप उभारणी करण्यात येऊ नये. मंडपासाठी वापरण्यात येणारे लोखंडी गज, खांब उभारताना ते विद्युतवाहिन्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वीजपुरवठा व जनरेटर असल्यास त्याकरिता स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक आहे. पाऊस व वादळवाऱ्यानंतर मंडपातील विद्युतीकरण व रोषणाई हाताळताना तपासणी करून घ्यावी. गणेश मंडळांनी भाविक भक्तांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विद्युतसुरक्षेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन कंपनीने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here