चिपळूणातील लोकअदालतीमध्ये ४८७ पैकी ११३ प्रकरणे तडजोडीने निकाली

0

चिपळूण : जिल्हा न्यायालयाच्या वतीने शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय व जिल्हा न्यायालयांतर्गत एकूण ४८७ प्रलंबित व १,८४८ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये विविध बँका, पतसंस्था, महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी, इतर वित्तीय संस्था, नुकसानभरपाईचे अर्ज तसेच कौटुंबिक हिंसाचाराची व पोटगीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रलंबित प्रकरणांतून ८८ लाखांची वसुली करण्यात आली.

या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायाधीश व वकिलांचे तीन पॅनेल कार्यरत होते. सदर लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. आर. कुलकर्णी, एम. आर. काळे तसेच पॅनेल विधिज्ञ नितीन सावंत, नयना पवार व रोहन बापट यांनी पाहिले. चिपळूण शहराचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता, या लोकअदालतीमध्ये पक्षकार व वकील उपस्थित होते.

यामध्ये ४८७ पैकी ११३ प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणांत एकूण ८७ लाख ९७ हजार ९६३.५४ इतक्या रकमेची तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच १७ वादपूर्व प्रकरणात ६२ हजार ८५० इतक्या रकमेची तडजोड होऊन वसुली झाली. त्यामुळे पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला. या लोकअदालतीला चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने लोकअदालत यशस्वी झाली.

या लोकअदालतीसाठी चिपळूण वकील संघ, वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ मनोहर यादव, जीवन रेळेकर, नितीन केळकर, अल्ताफ चिकटे, अल्ताफ दलवाई, सुयोग तावडे, ओंकार पालांडे, संजय पाटील, सरकारी वकील, पोलिस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून तालुका विधी सेवा समितीला सहकार्य केले. डॉ. अनिता नेवसे, अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश चिपळूण यांनी सर्वांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here