गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त; एकनाथ शिंदे यांची माहिती

0

मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज चाळीस हजार विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. नव्याने सुरू झालेल्या ७५ आभासी क्लासरूम आणि आज सुरू झालेल्या अभ्यासिका यांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील, अशी मला आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया व डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.

मंत्री लोढा यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त झाला असून, कौशल्य विकास प्राप्त युवकांना भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उद्योजकतेला लागणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान लक्षात घेऊन आयटीआयमध्ये विविध ९०० कोर्सेस शिकवले जातात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे. यामुळेच आज अनेक उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात. हीच बाब लक्षात घेऊन उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान युवा पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

मंत्री लोढा म्हणाले की, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. यू. पी. एस. सी.आणि एम. पी. एस. सी. तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, १०वी आणि १२ वी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. मुले व मुलींकरिता स्वतंत्र वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात येतील. यामध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह व इतर सुविधा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असेही मंत्री लोढा म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here