मुंबई : गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची तयारी सुरू आहे. दरम्यान, कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत.
आज म्हणजेच बुधवारी दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी पूर्णपणे अनारक्षित असलेली मेमू रेल्वे दिवा रेल्वे स्थानकावरून कोकणासाठी रवाना झाली. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पहिली मेमू रेल्वे दिव्याहून रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली.
या मेमू रेल्वेतून अनेक चाकरमानी आपल्या गावाकडे निघाले. ट्रेन स्थानकावरुन सुटताच गणपत्ती बाप्पा मोरया, असा जयघोष देखील ऐकायला मिळाला. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथ येथे कामानिमित्त स्थायिक झालेले कोकणवासीय मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात.
त्यामुळे चाकरमान्यांना कोकण गाठता यावे, त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सरकारकडून जादा एसटी बसेस तसेच रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यंदाही गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवात मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी पूर्णपणे अनारक्षित असलेली मेमू रेल्वे दिवा रेल्वे स्थानकावरून सुटली.
रेल्वे प्रशासनाने मेमू सुविधा उपलब्ध करून दिल्याने प्रवासी वर्गाने आभार व्यक्त केले आहे. रेल्वेच्या नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल झाले आहेत.
तिकीटांची वेटिंग लिस्ट मोठी आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतोय. हीच बाब लक्षात घेता. मध्य रेल्वेने यावर्षी गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
दुसरीकडे मध्य रेल्वेने १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान एलटीटी मंगळुरु अप आणि डाऊन च्या एकूण १६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या तीन गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 13/Sep/2023
