रत्नागिरी : तालुकास्तरीय व्हॉलीबॉल व जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलच्या संघांनी बाजी मारत विजय मिळवला. गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलने विजय मिळवला.
१४ वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात मिस्त्री हायस्कूलने फाटक हायस्कूलचा पराभव केला. या सामन्यात रफान आणि अर्श रियाज शेख या दोघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. १७ वर्षांखालील गटात मिस्त्री हायस्कूलच्या मुलींच्या संघाने जीजीपीएस संघावर मात करीत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश केला.
जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व पावस एज्युकेशन संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलींच्या संघाने १४ व १७ वर्षांखालील गटात पटवर्धन हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकावत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. १४ वर्षांखालील मुलांचा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षक सैफन चरखे यांचे मुख्याध्यापक जुबेर गडकरी, तालिमी इमदादिया संस्थेचे संस्थाध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव तन्वीर मिस्त्री, जाहीर मिस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निसार लाला व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
11:18 AM 13/Sep/2023
