राजापुरात भाजपाच्या विधानसभा प्रवास यात्रा २०२४ चा शुभारंभ

0

राजापूर : लोकसभा प्रवास यात्रेप्रमाणेच भाजपाच्या वतीने आता विधानसभा २०२४ प्रवास यात्रा संपर्क अभियान हाती घेण्यात आले असून सोमवारी राजापूर विधानसभा मतदार संघात याचा शुभारंभ करण्यात आला.

या अभियानांतर्गत हर घर भाजपा असा नारा देतानाच बुथ व शक्तीकेंद्र अधिक बळकट करताना विधानसभा मतदार संघातील ३४१ बुथवर भाजपाला ५१ टक्के इतके मताधिक्य देण्याचा निर्धार या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपाच्या वतीने आता लोकसभा प्रवास यात्रेप्रमाणेच विधानसभा प्रवास यात्रा अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचा राजापूर विधानसभा मतदार संघात सोमवारी प्रमोद जठार, राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अ‍ॅड. दिपक पटवर्धन, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाउपाध्यक्ष व राजापूर विधानसभा संयोजक रवींद्र नागरेकर, विधानसभा सहप्रमुख सौ. उल्का विश्वासराव, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

या विधानसभा प्रवास अभियानांतर्गत राजापुरात शेवडेवाडा येथे बुथ कमिटी अध्यक्षांची बैठक, जवाहर चौक पिकअपशेडमध्ये शक्तीकेंद्र प्रमुख व महिला आघाडीची बैठक पार पडली. यावेळी हर घर भाजपा असा नारा देत विधानसभा मतदार संघातील प्रत्येक बुथवर भाजपाला ५१ टक्के मते देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आल्याचे जठार यांनी सांगितले.या अभियानांतर्गत धार्मिक स्थळांना भेटी देण्यात आल्या. राजापुरातील पुरातन विठ्ठलपंचायत मंदिर व श्री निनादेवी मंदिराला भेट देण्यात आली. यावेळी विठ्ठलपंचायत मंदिर व्यवस्थापनाशी संवाद साधण्यात आला. या पुरातन मंदिराचा ढाचा न बदलता त्याची पुर्नबांधणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर श्री निनादेवी मंदिरात भंडारी समाज बांधवांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यात आल्याचे जठार यांनी सांगितले.राजापुरातील वखारीच्या ठिकाणी शिवसृष्टी निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्यात आले असून हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल असेही जठार यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ भाजपाला द्यावा- जठारकोकणात पालघर, ठाणे, कल्याण, मावळ, रायगड व रत्नागिरी सिंधुदुर्ग असे एकूण सहा लोकसभा मतदार संघ आहेत. यातील एकही मतदार संघ भाजपाकडे नाही. त्यामुळे आमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ हा भाजपाला सोडावा अशी आमची मागणी असून ती मागणी आंम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचवलेली आहे. महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षानेही याबाबत गांभीर्यपुर्वक विचार करावा अशी मागणी करत साडेतीन लाख मताधिक्क्याने या मतदार संघात भाजपाचा उमेदवार विजयी होईल असा दावा जठार यांनी केला आहे. कोकणातील उर्वरीत मतदार संघांबाबतही तेथील कार्यकर्ते आग्रही आहेत त्याबाबत वरच्या स्तरावर निर्णय होतील, मात्र हा मतदार संघ भाजपालाच मिळावा अशी आग्रही मागणी जठार यांनी केली आहे.

दोन दिवसात जिल्हाकार्यकारणी जाहीर होणार -राजेश सावंत

पुढील दोन दिवसात भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली जाणार असल्याची माहिती यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली. जिल्हयात भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाकडून येणारा प्रत्येक कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राजापूर तालुका अध्यक्ष निवडीबाबत मुलाखती झाल्या असून पुर्व आणि पश्चिम अशी दोन मंडळे करून दोन तालुका अध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत. त्यांचीही घोषणा लवकरच होईल असेही सावंत यांनी सांगितले. पुर्व भागात पाचल, ओणी व केळवली विभागाचा तर पश्चिम भागात राजापूर शहर, देवाचेगोठणे व कोदवली व सागवे विभागांचा समावेश असेल असे सावंत यांनी सांगितले.नव्याने जाहीर होणाऱ्या जिल्हा कार्यकारणीतीही राजापुरला चांगले स्थान असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी व पत्रकार परिषद प्रसंगी भाजपा महिला प्रदेशच्या सौ. शील्पा मराठे, भाजपा सहकार सेलचे प्रमुख अनिलकुमार करंगुटकर, माजी जि. प. सदस्य सुरेश गुरव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर, तालुका सरचिटणीस मोहन घुमे, अ‍ॅड. सुशांत पवार, स्वप्नील गोठणकर, सौ. शीतल पटेल, सौ. सुयोगा जठार, प्रा. मारूती कांबळे अरवींद लांजेकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 13-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here