कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि ज्योतिबा देवस्थानात तूर्तास शस्त्रधारी सुरक्षारक्षक नकोत, हायकोर्टाचे निर्देश

0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई मंदिर) आणि ज्योतिबा मंदिरातील जुने सुरक्षारक्षक काढून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक नेमण्यास मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास नकार दिला आहे.

मंदिर ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम हायकोर्टानं कायम ठेवली आहे.

काय आहे याचिका?
महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे रक्षक या दोन मंदिरांच्या सेवेत सन 2016 पासून तैनात आहेत. महालक्ष्मी मंदिरात 49 तर ज्योतिबा मंदिरात 10 सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांना काढून आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक मंदिर ट्रस्टला करायची आहे. तसं पत्र त्यांनी महामंडळाकडे दिलेलं आहे. याविरोधात या सुरक्षारक्षकांनी ॲड. अविनाश बेळगे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मंदिराला धोका आहे, आता जे सुरक्षारक्षक आहेत ते शस्त्रधारी नाहीत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सुरक्षारक्षक शस्त्रधारी आहेत. त्यामुळे जुने सुरक्षारक्षक काढून महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे, असा युक्तिवाद ट्रस्टच्या वतीनं केला गेला आहे.

मात्र याला याचिकाकर्त्यांनी विरोध केला आहे. आता जे मंदिराची सुरक्षा बघतात त्यांची नेमणूक भाविकांना रांगेतून सोडण्यासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी करण्यात आली आहे. परिणामी त्यांना सेवेतून काढता येणार नाही, असा दावा याचिकेतून केला गेला आहे. याची नोंद करून घेत हायकोर्टानं ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास अंतरिम मनाई केली आहे. मात्र जुने सुरक्षारक्षक न काढता तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करू शकता, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. मात्र हे अंतरिम आदेश रद्द करावेत, अशी मागणी ट्रस्टनं हायकोर्टाकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 13-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here