Ratnagiri : रिफायनरी भागातील कातळशिल्प संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळली

0

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु असली तरी प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या बारसूमधील कातळशिल्पांना मात्र संरक्षित
स्मारकाच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७० गावांमध्ये १७०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध रत्नागिरीच्या ‘निसर्गयात्री’ संस्थेनेला लावला आहे. या कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे.

अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल. मार्च २०२२ मध्ये ‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७ व सिंधुदुर्गातील एका कातळशिल्पास जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूंढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मात्र आता राज्य सरकारने यादीतून बारसूचे नाव वगळले आहे.

बारसूचा प्रस्ताव का गुंडाळला?

बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळय़ात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदारयीत्व निधी) करण्यात येईल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आल्याची सांगितले जाते.

कशेळी कातळशिल्पाची वैशिष्टय़े

रत्नागिरीपासून ३० किमीवर राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या सडय़ावर असलेले हे कातळशिल्प मध्याश्मयुगीन आहे. देशातील कातळशिल्पापैकी हे सर्वात मोठे असल्याचे मानले जाते १६ मीटर लांब आणि १४ मीटर रुंद हत्तीचे हे चित्र आहे. चित्रातील हत्तीचा कान ७ फूट आणि सोंड १८ फूट लांब आहे. हत्तीच्या पोटात इतर ८० चित्रे आहेत. कातळशिल्पाजवळ अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 13-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here