रत्नागिरी : संस्कृत भाषेत जगातला सर्वाधिक शब्दसंग्रह आहे. संस्कृत प्राचीन भाषा असून बऱ्याच भाषांची जननी आहे, असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये करिअर करण्यासाठी नवनव्या वाटा आहेत, असे प्रतिपादन राजापूर हायस्कूलमधील संस्कृतच्या शिक्षिका सौ. शोभा जाधव यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागातर्फे आयोजित संस्कृत दिन सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, १९६९ पासून संस्कृत दिन साजरा केला जात आहे. राजापूर हायस्कूलमध्ये संयुक्त संस्कृतऐवजी संपूर्ण संस्कृत सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. संस्थाचालकांमुळे त्याला यश आले. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनाही संस्कृत शिकवले जाते. संस्कृत ही फक्त शिकण्याची किंवा नोकरी मिळवण्यासाठी शिकायची भाषा नाही. संस्कारांची भाषा आहे. असत्याकडून सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करायला लावणारी भाषा आहे. लहान वयातच मुलांना संस्कारांची शिदोरी दिली पाहिजे. समाजात भ्रष्टाचार वाढत आहे, अशा वेळी संस्कृतच्या शिक्षणातून चांगले नागरिक घडवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी म्हणाले की, आयुष्यात अनेक अडचणी आहेत पण सकारात्मक विचाराने काम करायला शिकले पाहिजे. चांगल्या दृष्टिकोनातून आपण कार्यरत राहिले पाहिजे. संस्कृत व संस्कृती हे दोन्ही जवळचे आहे. महाविद्यालयाचा संस्कृत विभाग हे मोठे व्यासपीठ आहे. संस्कृतचा वारसा आपण जपला पाहिजे.
कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. सौ. जाधव यांच्या हस्ते गीर्वाणकौमुदी या संस्कृत हस्तलिखित अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 13-09-2023