नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार : चंद्रकांत पाटील

0

मुंबई : राज्यातील उच्चशिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे, आणि नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंगळवारी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकन संदर्भात कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मुंबई, गडचिरोली,जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड या विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले,नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे महत्वाचे आहे. परंतु अनेक महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकन केले जात नाही. याबाबत संबंधित विद्यापींठानी नॅक मूल्यांकनासाठी स्थानिक पातळीवर अशा महाविद्यालयांच्या काय अडचणी आहेत. याबाबत पडताळणी करावी आणि नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया रोखणे, महाविद्यालयांची संलग्नता रद्द करणे अशी कारवाई सुरू करावी अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी केल्या.

नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया सहज, सुलभ आणि अधिक सोपी व्हावी त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय नॅक मूल्यांकनसाठी पुढे येतील असे बैठकीत मा.कुलगुरू यांनी सांगितले. याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री यांना पत्र पाठवून याबाबत कळविण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 13-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here