भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर यांचे निधन

0

चेन्नई : भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर (वय ५७) यांचे (गुरुवार) चेन्नई येथे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. व्ही. बी. चंद्रशेखर क्रिकेट यांनी भारतीय संघाकडून सात एकदिवसीय सामने खेळले. ते आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. १९८८ मध्ये इराणी चषक स्पर्धेत तामिळनाडूकडून खेळताना चंद्रशेखर यांनी शेष भारत संघाविरुद्ध ५६ चेंडूत १०० धावांची स्फोटक खेळी केली होती. भारतातील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान शतक ठरले होते. व्हीबी यांचा हा विक्रम २०१६ पर्यंत अबाधित होता. २०१६ मध्ये ऋषभ पंतने ४८ चेंडूत शतक झळकावून हा विक्रम मोडला. १९८७-८८ च्या मोसमात तामिळनाडूने रणजी चषक, तर १९८८ मध्ये इराणी चषक जिंकला होता. १९८८ केलेल्या चांगल्या कामगिरीचा जोरावर चंद्रशेखर यांना भारतीय संघात स्थान मिळाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक, सीलेक्टर आणि समालोचक अशा विविध माध्यमांतून ते क्रिकेटसोबत कार्यरत राहिले. व्ही. बी. चंद्रशेखर यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी, मी एक चांगला मित्र गमावला आहे, अशा भावना व्यक्त केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here