मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

0

जालना : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे आमरण उपोषण मागे घेणार असून, साखळी उपोषण करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह इतर मंत्री आणि जरांगे यांच्यात होणारी चर्चा आणि त्यातून होणाऱ्या निर्णयाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मागील १६ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. यापूर्वी शासनाने तीन वेळेस मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ते प्रयत्न अयशस्वी ठरले होते. शेवटी सर्वपक्षीयांची बैठक झाली आणि त्यात दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करणे, आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वपक्षीयांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सहमती दर्शविली. या बैठकीतील चर्चेचा अहवाल जरांगे यांना देण्यात आला. त्यानंतर जरांगे यांनी मंगळवारी दुपारी शासनासमोर पाच अटी ठेवून एक महिन्याचा वेळ देण्याची तयारी दर्शविली. शिवाय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळाने यावे आणि लेखी आश्वासन द्यावे, त्यानंतरच आपण आमरण उपोषण मागे घेवू. इथेच बसून साखळी उपोषण करू, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 13-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here