मुंबई : मुंबई भाजपतर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टीम तयार झाली आहे. याही वर्षी गतवर्षी प्रमाणे मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज (दि. १३) पत्रकार परिषदेत दिली.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यावेळी मुंबई भाजपतर्फे 1 तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे 1 आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितशे राणे यांच्यातर्फे 2 (मोदी एक्सप्रेस) अशा 4 रेल्वे गाड्यांचे पूर्ण नियोजन झाले आहे. अजून 2 गाड्या प्रस्तावीत असून एकूण 6 रेल्वे गाड्यांची सुविधा कोकणवासीयांना करण्यात आली आहे. 15 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
तर मुंबई भाजपतर्फे कोकणातील चाकरमान्यांसाठी 256 एसटी बसची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही नगरसेवकांनी आपापल्या विभागात खाजगी बसच्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंधेरी येथून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यातर्फे 51 बस सोडण्यात येत आहेत. वांद्रे पश्चिम येथून ही 31 एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग अशा कोकणातील सर्व गावापर्यंत 338 हून अधिक बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मुंबईत याचवेळी “मुंबईचा मोरया 2023” या भव्य गणेशोत्सव स्पर्धेची लगबग सुरु आहे. गतवर्षी या स्पर्धेला मुंबईकर गणेशोत्सव मंडळांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. गतवर्षी 1200 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सहभाग घेतला होता. यंदा तर 2500 हून अधिक गणेश मंडळे सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे, असा विश्वास आमदार अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त करताना मुंबईतील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही आ. शेलार यांनी केले आहे.“मुंबईचा मोरया 2023” ही स्पर्धा उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट सजावट/ देखावा आणि उत्कृष्ट परिसर स्वच्छता या तीन गटात होणार असून असून प्रत्येक गटात पहिले बक्षीस 3 लाखांचे असून ही तीन पारितोषिके त्याचप्रमाणे प्रत्येक गटात दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख 50 हजार रुपये तर तृतीयसाठी 75 हजार रुपये बक्षीसे देण्यात येणार आहेत. तर 11 हजाराची 12 उत्तेजनार्थ अशी बक्षीसे तर सहभागी सर्व मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे विजेते ठरविण्यासाठी एकूण 30 तज्ञ गटांची स्थापना करण्यात येणार असून मुर्तीची सुबकता, सजावट, स्वच्छता आणि सामाजिक संदेश या निकषांवर निष्पक्ष निर्णय घेऊन स्पर्धा समितीकडून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
भाजप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर आणि त्यांची टीम दिवसरात्र याचे नियोजन करीत आहे. तर विधान परिषदेचे गट नेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांचाही या कामी मोठा पुढाकार आहे. या पत्रकार परिषदेला महामंत्री संजय उपाध्याय, कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, अमरजीत मिश्र, नवनाथ बन आदी उपस्थित होते.
आरे मध्ये कृत्रिम तलाव करणार
आरेमध्ये कृत्रिम तलाव तयार करुन विसर्जन व्यवस्था करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास डीपीडीसीमधून फंड खर्च करु, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 13-09-2023
