रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे.
गणपतीपुळेतील एक गाव एक गणपतीची प्रथा पाचशेहून अधिक वर्षांची आहे. परंपरेप्रमाणे भाद्रपदी उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारपासून (ता. १६) उत्सवाला प्रारंभ होणार असून, २० सप्टेंबरला सांगता होईल.
उत्सवात कीर्तन, महाप्रसाद, सहस्र मोदक समर्पण, पालखी मिरवणूक असे विविध कार्यक्रम प्रथेप्रमाणे साजरे होणार आहेत. गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिरात १६ ला सकाळी ९.३० ते ११.३० वेळेत श्रींची महापूजा व प्रसाद वितरण होईल. १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत कीर्तनकार हभप कैलास खरे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले आहे. १६ ते २० सप्टेंबर या काळात दररोज सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत आरती, मंत्रपुष्प होईल. १७ ला सहस्र मोदक समर्पण कार्यक्रम सकाळी ११ ते १२ या वेळेत होईल. १९ ला गणेश चतुर्थीला दुपारी ४ ते ६ या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येणार आहे.
कोकण पट्ट्यात एक गाव एक गणपती अशी उदाहरणे कमी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एक गाव एक गणपतीची प्रथा जपली जाते; परंतु गणपतीपुळे येथे गेली अनेक दशके एकच गणपती ही प्रथा भाद्रपदी उत्सवात जपली जात आहे. गणपतीपुळे व आसपासच्या परिसरातील अनेक भाविक गणेशमूर्ती घरी न आणता गणपतीपुळ्याच्या श्रींची पूजा करतात. त्यामुळे या उत्सवाला नेहमी गर्दी असते तसेच गणेशोत्सव काळात पर्यटकही धार्मिक पर्यटनासाठी येत असतात. यामुळे गणपतीपुळे येथे उत्सवकाळात नेहमीच वर्दळ असते.
श्रींच्या मंदिरात आयोजित कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच प्रा. विनायक राऊत, विद्याधर शेंड्ये, अमित मेहेंदळे, डॉ. विवेक भिडे, श्रीहरी रानडे, डॉ. श्रीराम केळकर, नीलेश कोल्हटकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 13-09-2023
