रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे एम. आय. डी. सी. तील कारखान्यांमुळे दुर्गंधी वाढत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारखान्यातून होणारी दुर्गंधी तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्हा निसर्ग रम्यतेने नटलेला आहे. तसेच वातावरण सुंदर व स्वच्छ आहे. त्याची जोपासणा करणे आवश्यक असून ती जबाबदारी प्रशासनाची आहे. रत्नागिरी शहरालगतच्या औद्योगिक वाढीसह जिल्ह्यातील विविध भागात कारखानदारी वाढत चालली आहे. त्याचबरोबर प्रदुषणाची पातळीही वाढल्याचे दिसत आहे. स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ लागला आहे. या कारखानदारीच्या आजूबाजूच्या परिसरात विशेषतः मारुतीमंदिरपासून वरच्या भागात दुर्गंधीमय वातावरण निर्माण झालेले आहे.
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसीमधील भागातील काही कारखान्यातून दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या प्रदुषणामुळे रहिवाशामध्ये अनेक प्रकारचे आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा तक्रारी आल्याचेही शेकासन यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रत्यक्षात आरोग्यास हानिकारक ठरत असलेल्या कारखान्यांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष असणे अत्यावश्यक आहे. मात्र, त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी जिल्हा उपाध्यक्ष शेकासन यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 14-09-2023