उपोषण सोडा म्हणतात… पण ते सोडवायला कुणी येतच नाही; मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

0

जालना : आम्ही उपोषण सोडायला तयार, पण ते सोडवायला कुणी येतच नाहीत, आरक्षणाचा (Maratha Reservation) जसा खेळखंडोबा मांडलाय त्यातलाच हा प्रकार असल्याचं दिसतंय अशी टीका मनोज जरांगे (Manoj Jarange On CM Eknath Shinde Jalna Visit) यांनी केली.

एखादा मित्र दुसऱ्या मित्राला जसं म्हणतो की ये… नुसतं ये म्हणतो. तसं हे म्हणतात की आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ द्या. पण ती वेळ नेमकी कशासाठी पाहिजे हे मात्र सांगत नाहीत असंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जालना दौरा रद्द केल्यानंतर मनोज जरांगे यांनी एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची काहीच माहिती नव्हती, अधिकृत पत्रही नव्हतं. संध्याकाळी 6 वाजता अर्जुन खोतकरांनी सांगितलं होतं की ते मुख्यमंत्र्यांना घेऊन येतील. माध्यमांच्या बातम्यांमधूनही सकाळपासून हीच माहिती समोर येत होती. पण आता त्यांचा दौराही रद्द झाला, याचीही अधिकृत काहीच माहिती नाही.

उपोषण सोडा म्हणतात पण…
उपोषण सोडा म्हणतात पण सोडवायला कुणीही येत नाही. हे आरक्षणाप्रमाणेच झालं, देतो म्हणतात पण देत नाहीत. सरकारच्या दोन अटी होत्या. एक महिना वेळ द्या आणि आमरण उपोषण सोडा असं सांगण्यात आलं. पण सर्वांनी सांगितलं की आरक्षणासाठी 40 दिवस द्या, तेही दिलं. पण मंत्री आता आमच्यावरच खापर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय. मी शेवटी म्हटलं की आमरण उपोषण सोडतो पण साखळी उपोषण सोडणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय हे उपोषण सोडणार नाही.

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बुधवारचा नियोजित जालना दौरा तूर्तास रद्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव जालन्यात जाऊ नये असं पत्र आल्यानं हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेआधीच्या व्हायरल व्हिडीओमुळं मुख्यमंत्र्यांना जालन्यात विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव जालन्यात जाऊ नये असं पत्र आल्यानं त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी सलग सोळा दिवस उपोषण करणारे मनोज जरांगेंनी सर्वपक्षीय बैठकीनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु हे उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं यावं अशी एक अट जरांगेंनी घातली होती. मुख्यमंत्र्यांकडून ती अट मान्यही करण्यात आली होती. परंतु पत्रकार परिषदेआधीची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कुजबूज सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here