चंद्रावर यान पोहोचले; पण अत्याचार कमी झाले नाहीत : रूपाली चाकणकर

0

दापोली : चंद्रावर यान पोहोचलं, देशाची खूप प्रगती झाली, तरीही महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी झालेले नाहीत. आपण कितीही महिला सबलीकरण, सक्षमीकरणाच्या गप्पा मारत असलो तरी महिलांना आजही अन्याय, अत्याचाराला बळी पडावे लागत आहे.

देशातील हे चित्र बदलण्यासाठी महिलांनीच यापुढे सक्षम होणे गरजेचे आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.
दापोलीतील रसिक रंजन सभागृहात मंगळवारी (१२ सप्टेंबर) राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाला रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष साधना बोत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

चाकणकर म्हणाल्या, देश कितीही प्रगतीकडे वाटचाल करत असला तरी महिलांवरील अन्याय, अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. हुंड्याच्या नावाने मुलींचा बाजार मांडला जात आहे. समाजातील अनिष्ठ, रूढी, परंपरा यामध्ये महिला भरडल्या जात आहेत. आधुनिक युगात वावरताना महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या भोवती फेरे मारण्याऐवजी, वास्तवतेचे भान ठेवायला हवे. मंगळागौरच्या माध्यमातून ‘छेडछाडमुक्त मंगळागौर’, ‘बालविवाहमुक्त मंगळागौर’, ‘महिलांवरील अन्याय, अत्याचार, बालविवाह, हुंडामुक्त मंगळागौर’ असा संकल्प करूया, असे त्या म्हणाल्या.

महिला सक्षमीकरण, सबलीकरण बोथट शब्द
महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे शब्द आता बोथट झाल्यासारखे वाटायला लागले. परंतु, सुजाण नागरिक म्हणून आपण खरोखरच सक्षम झालो का, हा प्रश्न महिलांनी स्वतःलाच विचारायला हवा. महिलांना घटनेने अधिकार दिले आहेत. मात्र, महिलांना त्यांचे अधिकारच माहीत नाहीत. महिलांनी आपले अधिकार आणि कर्तव्ये याची माहिती करून घेणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

परिस्थिती बदलायला हवी
पुरुषप्रधान संस्कृतीत समाजात महिलांना आजही दुय्यम स्थान दिले जाते. एखाद्या स्त्रीला मुलगा व्हावा की, मुलगी हे ठरवण्याचा अधिकार त्या सासरच्या मंडळीला आहे. वंशाचा दिवा मुलगाच हवा, असा हट्ट केला जातो. ही परिस्थिती बदलायला हवी.

अत्याचाराविरोधात पेटून उठा
महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्याचे काम आपल्या माध्यमातून सुरू आहे. परंतु, महिलांनी वास्तवाचे भान ठेवून समाजात वावरावे. अत्याचार सहन करत राहण्यापेक्षा अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. जोपर्यंत महिला पेटून उठणार नाहीत तोपर्यंत महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 14-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here