जालना : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कोंडी अखेर फुटली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी फळांचा रस प्राशन करत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरु होती. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, राजेश टोपे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली.
दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाचा तिढा सुटत नसल्याचे लक्षात येताच मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले जवळचे व अत्यंत विश्वासू सहाकारी उदय सामंत यांना जालना येथे पाठवले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश मनोज जरांगे यांना दिला. त्यानंतर मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून सातत्याने संवाद होत होता. अखेर ना. सामंतांच्या शिष्टाईला आज यश आल्याचे दिसून आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 14-09-2023