रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरी गणेशोत्सव पर्यावरणपूरक व प्रदुषणमुक्त साजरा करा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
यासाठी ग्रामपंचायत स्तरावर व्यापक जनजागृती करुन विविध स्वच्छतेविषयक व पर्यावरणपूरक उपक्रम खालील प्रमाणे राबविण्यात येत आहेत.
गणेश उत्सव साजरा करताना गणेशमूर्त्या पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या किंवा इकोफ्रेंडली असाव्यात. तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करुन गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मुर्तीकारांना सुचना देण्यात याव्यात. गणेश उत्सव कालावधीत तयार करण्यात येणारे मखर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करुन सजविण्यात यावे. तसेच थर्माकॉल व प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्यावावत गावात जनजागृती करण्यात यावी. गणेश उत्सव काल व तद्नंतर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्लास्टिक बंदी करण्यात यावी. तसेच प्लास्टिक बंदी बाबत गावात जनजागृती करण्यात यावी.
गणेश उत्सव कालावधीत प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीचे विसर्जन करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येक ग्रामपंचायतींनी घ्यावी. त्यासाठी ग्रामपंचायतींनी ज्या ठिकाणी गणेशमुर्ती विसर्जन केले जाते त्याठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करुन गणेश मूर्तीचे विसर्जन होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत. गणेश उत्सव कालावधीत विसर्जनादरम्यान गणेशमुर्ती समवेत येणारे निर्माल्य नदी, समुद्र, जलाशयात विसर्जित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावाजवळ निर्माल्य कलश ठेवण्यात यावा. गणेशमुर्ती समवेत येणारे सर्व निर्माल्य कलशामध्ये जमा करण्यात यावे. विसर्जनापूर्वी व विसर्जनानंतर ग्रामपंचायत क्षेत्रामधील समुद्र किनारे, तलाव, नदी काठ या ठिकाणी गणेशोत्सव मंडळ, महिला बचत गट, तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, औद्योगिक कारखाने यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी.
सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वच्छतेविषयक किर्तन, नाट्यछटा, पथनाट्य यांचा समावेश करण्यात यावा. गणेशोत्सवामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत गावस्तरावर गणेशोत्सव मंडळे, महिला बचत गट, तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करुन लोकसहभागातून व श्रमदानातून सार्वजनिक, सामुहिक व वैयक्तिक सांडपाणी निचरा करण्यासाठी शोषखड्डयांची निर्मिती, गांडूळ खत प्रकल्पाची निर्मिती करण्याबाबत आवाहन करण्यात यावे व त्यासाठी मार्गदर्शन करावे.
किशोरवयीन मुलींसाठी व महिलांसाठी ग्रामपंचायत स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावा. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रशिक्षित केलेल्या ग्रामपंचायत स्तरावरील महिला शिक्षिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घ्यावे. गणेशोत्सव काळात ग्रामपंचायत स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या समन्वयाने आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात यावे. ११) सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळाच्या सहकार्याने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. यामध्ये परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, पाण्याचे स्त्रोत स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणची परिसर स्वच्छता, सर्व धार्मिक स्थळांची परिसर स्वच्छता करण्यात यावी. ग्रामपंचायतींनी उपरोक्त उपाययोजना केल्याने पाण्याच्या प्रदुषणामुळे मनुष्य, पशुधन, जलचर, प्राणी, वनस्पती व नैसर्गिक साधनांवर होणारा विपरीत परिणाम थांबवणे शक्य होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 14-09-2023
