होम क्वॉरन्टाईन असलेल्या व्यक्तीचा जमिनीच्या वादातून मारहाणीत मृत्यू

राजापूर : तालुक्यातील तुळसवडे इथे होम क्वॉरन्टाईन असलेल्या व्यक्तीची जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. बुधाजी तोसकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांना भावाच्या कुटुंबातील पाच जणांनी मध्यरात्री जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. बुधाजी हे देवगड येथे खलाशी म्हणून काम करतात. तर त्यांचे कुटुंब मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्य करते. दहा दिवसांपूर्वी बुधाजी आपल्या मुळगावी परतले. पण, कोरोनाच्या काळात ते गावाला आल्याने ते होम क्वॉरन्टाईन होते. यावेळी त्यांचा आणि भावाच्या कुटुंबियांचा जमिनीवरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये मंगेश तोसकर, मेघना मंगेश तोसकर, चंद्रभागा चंद्रकांत तोसकर, वैष्णवी विश्वास तोसकर आणि मीनाक्षी चंद्रकांत तोसकर यांची नावे प्रथमदर्शनी समोर आली आहेत. दरम्यान, तोसकर कुटुंबियांमध्ये मागील 5 ते 6 वर्षांपासून जमिनीवरुन वाद आहे. काही काळापूर्वी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला होता. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी बुधाजी हे देवगड येथून गावी आले. त्यावेळी त्यांना मालकाने दिलेले 30 हजार रुपये पुतण्या विश्वास तोसकर याने काढून घेतल्याची तक्रार केली होती. पाच ते सहा दिवसांपूर्वीचा हा प्रकार आहे. त्यावरुन त्यांनी विश्वास तोसकर यांना विचारणा केली होता. त्यावरुन देखील मोठा वाद झाला होता. यावेळी पोलिस पाटील यांनी हस्तक्षेप करत पोलीस ठाण्यात वाद मिटवावा असेही सुचवले होते. पण, रविवारी मध्यरात्री पुन्हा या कुटुंबामध्ये जमिनीवरुन वाद झाला. त्याचे रुपांतर जबर मारहाणीत झाले. यावेळी काठ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे बुधाजी जबर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बुधाजी यांचा मुलगा, पत्नी आणि मुलगी सध्या मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्याला आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:45 AM 23-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here