रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चातर्फे रत्नागिरी पालिकेवर गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरणे, मोकाट गुरांचा बंदोबस्त, स्ट्रीटलाइट दुरुस्त करणे, डासप्रतिबंधक फवारणी करणे इतर शहरातील विविध प्रश्नांवर टाळ मोर्चा काढण्यात आला. पालिका कार्यालयासमोर टाळ वाजवत आरती म्हणून निषेध करण्यात आला.
मोर्चाच्या शिष्टमंडळातर्फे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी गणपतीच्या आधी शहरातील सर्व खड्डे बुजविणे, स्ट्रीटलाइट दुरुस्त करणे ही कामे केली जातील, असे आश्वासन दिले.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याशी सोमेश्वरमधील काही ग्रामस्थांनी संपर्क साधून आम्ही शहरातील मोकाट गुरांचे पालन करू, त्यासाठी गुरे तेथे आणून द्यावी, असे त्यांनी सांगितले होते. त्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. गुरे तेथे पोहोचवू आणि त्यांना लागणाऱ्या चारापाण्याच्या खर्चाची थोडीफार तरतूद करू, असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या भागात डासप्रतिबंधक फवारणी केली जाणार असेल त्या दिवशी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले जाईल. स्ट्रीटलाइट बंद असतील त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 15-09-2023
