अमित शाहांच्या दौऱ्याला गालबोट लागू नयेत म्हणून जालन्यातील उपोषण संपवण्याचे दिल्लीतून आदेश : संजय राऊत

0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपलं उपोषण कालच मागे घेतलं आहे. मात्र, मराठा आरक्षण आणि अंतरवाली सराटी गावातील उपोषणावरून सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अंतरवाली गावातील उपोषणावरून गंभीर आरोप केला आहे. अमित शाह (Amit Shah) औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार होते, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला कोणतेही गालबोट लागू नयेत म्हणून उपोषण संपवण्याचे दिल्लीतून आदेश होते, असे राऊत म्हणाले आहेत. औरंगाबाद येथे अयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, मराठवाड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठक आणि अमित शाह यांच्या दौऱ्याला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी जालन्यातील मनोज जरांगे यांचे उपोषण कोणत्याही परिस्थितीत संपवण्याचे दिल्लीतून आदेश होते. ज्या प्रकारे हे आंदोलन सुरू आहे ते ऐतिहासिक आहे. मुख्यमंत्र्यांना तिकडे यावं लागलं, दोन उपमुख्यमंत्री पळून गेले. खरंतर त्या दोन मुख्यमंत्र्यांनी यायलं पाहिजे होतं. हा संपूर्ण सरकारचा प्रश्न असून एकटे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. अजित पवार तर त्या समितीवर होते. मात्र डरपोक आणि बेकायदेशीर सरकार आहे. प्रत्येक संकटापासून सरकार पळून जात आहे.

मंत्री मंडळाच्या बैठकीवरून टीका

दरम्यान याचवेळी औरंगाबाद येथे होत असलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीवरून देखील राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात अलिशान हॉटेल बुक करण्यात आल्याच्या प्रश्नाला उत्तर देत राऊत म्हणाले की, हे सरकारच बेकायदेशीर असताना हा खर्च का होत आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्व हॉटेल बुक केले आहेत का? आणि ते कोणासाठी असा प्रश्न राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका…

या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सैनिकांची हत्या झाली. चार तरुण लष्करी अधिकारी एकाचवेळी शहीद होतात. या घटनेने संपूर्ण देश दुःखात होता. मात्र, त्याचवेळी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत पक्षाच्या कार्यालयात स्वतःवर फुलं उधळून घेत होते. दिल्लीतील खान मार्केटमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी शिवराज पाटील भेट देण्यासाठी गेले. या भेटीनंतर त्यांनी फक्त शर्ट बदलला म्हणून त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. असे असताना आमच्या चार लष्करी अधिकाऱ्यांची हत्या होते, त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरते. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यालयात उत्साह साजरा करते,अशी टीका राऊत यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 15-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here