मनोज जरांगेंनी उपोषण मागं घेतल्यानंतर राज ठाकरेंनी लगावला मिश्किल टोला..

0

मुंबई : मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरुवारी अखेर उपोषण मागं घेतलं. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर अखेर १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागं घेतलं. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संदीपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांचीदेखील उपस्थिती होती. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपलं उपोषण मागं घेतलं. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून सरकारला मिश्किल टोला लगावला आहे.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मनोज जरांजे यांनी उपोषण मागं घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो. आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे

राज ठाकरेंचा मिश्किल टोला
तसेच गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो, असा मिश्किल टोला देखील राज यांनी लगावला.

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी ५ अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही राजेंची उपस्थिती आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह काही मंत्री हजर असताना त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर, भाषण करताना मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांच्या कामाचं कौतुक केलं. “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही” असं म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 15-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here