राजापूर : रत्नागिरी जिल्हयाची आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजापूरची परंपरा ही शांततेची आणि सलोख्याची आहे. त्यामुळे ही बैठक केवळ औपचारिकता असून आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण साजरे करताना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत साजरे करा आणि तुमचे वर्षानुर्ष असलेले सामाजिक बंध कायम जोपासा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी येथे केले.
सोशल मिडियाच्या होणाऱ्या गैरवापरावर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. सोशल मिडियावर व्हायरल केल्या जाणाऱ्या काही पोष्टमुळे समाजात तेढ निर्माण होते, त्यामुळे याबाबत आपण सगळयांनी जागरूक राहिले पाहीजे असे नमुद करत अशा प्रकारे कुणी जाणीव पुर्वक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल असा ईशाराही कुलकर्णी यांनी दिला.
आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव तसेच मुस्लीम बांधवांच्या ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमिवर बुधवारी राजापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समिती, मोहल्ला कमिटी सदस्य, राजकिय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, गणेशोत्सव मंडळे, व्यापारी व विविध संघटनांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत व्यासपीठावर प्रांताधिकरी वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, डॉ. समाधान पाटील, राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, गटविकास अधिकारी विजय गुंडपाटील, नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी, महामार्ग वाहतुक विभागाचे विक्रमसिंह पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.
प्रांरंभी तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी मनोगत व्यक्त करत राजापूर तालुक्याची परंपरा ही शांततेची असून सर्व सण हे पारंपारिक पध्दतीने साजरे केले जात असल्याचे सांगितले. तर प्रांताधिकारी वैशाली माने यांनी राजापूरात काम करताना अत्यंत चांगला अनुभव येत असल्याचे नमुद करत जनतेचे कायमच सहकार्य असते. गणेशोत्सव व ईद ए मिलाद कार्यक्रमांसाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी नगराध्य हनिफ मुसा काझी यांनी जर ईद ए मिलाद सण २८ रोजी साजरा होणार असेल तर त्या दिवशी सकाळच्या सत्रात मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली. यावर जिल्हा पोलीस अधिक्षक कुलकर्णी यांनी पोलीस यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता मुस्लीम बांधवांनी २९ रोजी हा सण साजरा करावा अशी विनंती केली. जिल्हयात सर्वच ठिकाणी याबाबत सामंजस्याने चर्चा होऊन तसा निर्णय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वाहतुक व्यवस्था, मोकाट गुरे, महामार्गावरिल वाहतुक समस्या, अपघात, पार्किंग, रस्त्यावरिल खड्डे, खंडीत होणारा विजपुरवठा यावर उपस्थित सदस्यांमधून पत्रकार महेश शिवलकर, कमलाकर कदम, अरवींद लांजेकर, भरत लाड, सौ. शीतल पटेल, सौ. माधवी हर्डीकर, प्रतिभा मराठे, विजय कुबडे, सुनिल जठार, सौ. धनश्री मोरे, अद्वैत अभ्यंकर, सौ. श्रृती ताम्हनकर आदींनी प्रश्न उपस्थित केले. यावर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे, नगरपरिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनु दुधाडे यांनी आपल्या विभागाशी प्रश्नांबाबत कशा प्रकारे कार्यवाही करण्यात येणार आहे याची माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना कुलकर्णी यांनी संपुर्ण प्रशासनाला ज्या काही सुचना द्यावयाच्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. आपल्या सगळयांचेही सहकार्य यासाठी मोलाचे असून हे दोन्ही सण पारंपारिक पध्दतीने साजरे करून राजापूर तालुक्याची शांततेची परंपरा जपुया असे आवाहन केले. या उत्सव काळात सर्व विभागांनी अधिक सतर्क रहा असे आवाहनी कुलकर्णी यांनी केले. या उत्सवांच्या माध्यमातुन आपण पर्यावरणाचेही रक्षण करूया असेही आवाहन कुलकर्णी यांनी केले. तर या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कशेडी ते राजापूर अशी चौदा स्वागत सुविधा केंद्र सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू, सुलतान ठाकूर, सौरभ खपडे, हनिफ युसुफ काझी, यांसह विविध संघटना पदाधिकारी, मोहल्ला कमिटी सदस्य, सरपंच, राजकिय पक्षांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शांतता समिती सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 15/Sep/2023
