रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांना भारतीय रेल्वेकडून मिळणारी रेल्वे प्रवास भाड्याची सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने पंतप्रधानांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
रेल्वेकडून मिळणारी रेल्वे प्रवास भाड्याची सवलत करोना काळात बंद करण्यात आली. करोना काळ संपून तीन वर्षे होत आली तरी ती पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही सवलत तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ते पंतप्रधानाकडे पाठविण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी या निवेदनाचा स्वीकार करून ते पंतप्रधानांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळातील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये, सचिव सुरेंद्र घुडे, सदस्य रमाकांत पांचाळ, रमेश गोवेकर, श्रीमती संजीवनी जामखेडकर आदी सदस्य उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती उद्योग मंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायकराव राऊत यांनाही देण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 15-09-2023
