रत्नागिरी : दापोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे संघटन ग्रामीण भागात मजबूत करून त्यांच्या स्वप्नातील आदर्शवत मतदारसंघ तयार करणार आहे, अशी ग्वाही दापोलीचे आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी दिली.
शिवसेनेतर्फे मंडणगड येथील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत श्री. कदम बोलत होते. ते म्हणाले, पक्षविरहित कामे करून मतदारसंघाचा आणि मतदारसंघातील जनतेचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे.
मेळाव्याला मंडणगड तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना श्री. कदम पुढे म्हणाले की, शिवसेना संघटना म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. हे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मी स्वत: करणार असून शिवसेना संघटना स्थापन झाल्यापासून प्रत्येक शाखेत गावाची बैठक, जनसंपर्क ही पद्धत स्व. बाळासाहेब ठाकरे यांची होती. मध्यंतरीच्या काळात ती बंद झाली. मात्र ती पुन्हा नव्याने सुरू करून जनतेचा विकास व पक्ष संघटन मजबूत करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. मी स्वतः वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन मतदारसंघातील गावनिहाय कामांचा आणि पक्षवाढीचा आढाव घेणार आहे.
कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 15-09-2023
