रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील सोलगाव सड्यावर चांदीची काट भागात ग्रामस्थांना घंटासदृश कातळशिल्प आढळले आहे. या कातळशिल्पांचे संवर्धन ग्रामस्थांच्या सहकायनि करण्यात येणार असल्याचे ‘निसर्गयात्री’ तर्फे सांगण्यात आले.
या चित्राच्या शेजारी दोन प्राण्यांच्या रचना आहेत. घंटेसारखी ही रचना २० फूट लांब आणि १७ फूट रुंदीची आहे. या रचनेचा बाह्य आकार एका बाजूने पाहिल्यावर देवळातील घंटेसारखा वाटतो. वरच्या बाजूला साखळी अडकवण्यासाठी असलेला कान, त्या खाली लंब वर्तुळाकार आकाराची घंटा आहे. हीच रचना बरोबर विरुद्ध दिशेने पाहिल्यावर सरबताचा ग्लास असावा, अशी भासते.
कोकणातील कातळशिल्प शोधकर्त्यांनी या ठिकाणी नुकतीच भेट दिली. सड्याच्या धारेपासून तीन किलोमीटर घंटा व आणखी दोन कातळशिल्प आहेत. याच सड्यावर आठ वर्षांपूर्वी आणखी एक कातळशिल्प रचना ठिकाण स्थानिक मंडळींच्या सहकार्याने शोधून काढले होते. या ठिकाणापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर घंटेचे कातळशिल्प आहे. ही चित्रे प्रतीकात्मक, भौमितिक स्वरूपाची आहेत. त्यामुळे त्याचा अर्थ जाणून घेणे थोडे अवघड काम आहे. १० फूट लांब मगरीची चित्ररचना व तिसरी रचना ६ फूट लांब घोरपडसदृश प्राण्याची आहे. चांदीची काट येथून दीड किलोमीटरवर तळ्याची पंडळ भागात बारमाही नैसर्गिक तळे आहे. तळ्यापासून पाट काढला असून सड्याच्या कुशीतील गावाला पाणी पुरविले जाते. कातळशिल्प सापडेल या आशेने ग्रामस्थ लक्ष्मण नांगरेकर, चंद्रकांत नांगरेकर, सुनील नांगरेकर, सतीश कामतेकर, वैभव कडेकर, भिकाजी मल्हार, संतोष गावेलकर, नितीन बाणे, शिवाजी बाणे आणि नितीन नवाळे यांनी सड्यावर भटकंती केली. यात त्यांना तीन कातळशिल्पे सापडली. नंतर ग्रामस्थांनी धनंजय मराठे यांना माहिती कळवली. तसेच नांगरेकरवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांनी निरोप पाठवला व ‘निसर्गयात्री’ची टीम सोलगावात पोहोचली. सोबत शाळेतली मुले निहार नवाळे, विरेन परवडी, शरण्य सोड्ये, दीप्ती आईर, आर्या दीक्षित, निशांत नवाळे व मुख्याध्यापक दीपक धामापूरकर आणि शिक्षक ज्ञानेश्वर मगदूम, ग्रामस्थ लक्ष्मण नांगरेकर आणि सुनील नांगरेकर होते. या मोहिमेत सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, ऋत्विज आपटे, केदार लेले, प्रतीक जोशी, नीलेश आपटे, सुशील पेटकर, प्रसन्ना खानविलकर, रेणुका जोशी सहभागी झाले.
निसर्गरम्य सडा
नांगरेकरवाडीतून सड्यावर गर्द झाडीतून जाणाऱ्या घाटीने १० मिनिटांत सडा लागतो. हा सर्व परिसर आता हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटला आहे. तिथेच जवळ जांगळदेवाचे छोटे मंदिर, दळ्यातील राखणीसाठी उभारलेली मचाण, वड, सातवीण, ऐन, कुंभासारखे वृक्ष, तर करवंदी, अंजनी, दिंडासारख्या झुडूपवर्गीय वनस्पती आहेत. सोनकी, सीतेची आसवे, गेंद, गवती दवबिंदू, निळाई, कापरी कमळ, कंदील पुष्प अशी अगणित रंगीबेरंगी फुले या परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. शिवाय सड्यावर वावरणारे बिबट्या, रान डुकरे, ससे, साळिंदर इत्यादी प्राण्यांचे अस्तित्व त्यांनी मागे सोडलेल्या खुणांमधून जाणवले.
शिक्षकांची तळमळ, मुलांचा चौकसपणा, ग्रामस्थांचे सहकार्य यातून वारसा संवर्धनाचे आमचे प्रयत्न आता खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. हाच नाद या सोलगावच्या सड्यावर आढळून आलेल्या कातळशिल्परूपी घंटेने निर्माण केला आहे :- सुधीर रिसबूड
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 15/Sep/2023
