रत्नागिरी : रत्नागिरी शहर व परिसरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम रविवार, १७ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मोकाट गुरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सवात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोकाट जनावरे पकडून ती चंपक मैदानात तात्पुरत्या स्वरूपात बंदिस्त केली जाणार आहेत. याठिकाणी तारांचे कंपाऊंड उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गुरांना पाऊस व उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी शेडही बांधली जाणार आहे. याठिकाणी गुरांच्या चारा, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दिवस-रात्र देखभालही केली जाणार आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा, नगर पालिका, पशुसंवर्धन विभाग व एनजीओंकडून ही मोहीम राबवली जाणार आहे. शहर परिसरात सुमारे २५० ते ३०० जनावरे असून त्यातील २० ते २५ गुरे ही लम्पीने ग्रस्त असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे मोकाट गुरांना लम्पीचा त्रास होऊ नये म्हणून लम्पीग्रस्त गुरांना वेगळे ठेवले जाणार आहे. त्यांच्यावर औषधोपचार पशुसंवर्धन विभागाकडून केले जाणार आहेत.
मोकाट गुरे पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून त्या प्रत्येक पथकात १० लोकांचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पकडलेली गुरे जर शेतकऱ्यांना पाहिजे असतील, तर ती त्यांना देण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची गुरे आहेत, त्यांनी ती घेऊन जावीत; अन्यथा अशा शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी बर्गे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. राजापूर शहरामध्येही मोकाट गुरांचा प्रश्न असून, त्याबद्दलही तक्रारी वाढल्यामुळे राजापुरातही गुरे पकडण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 16/Sep/2023
