रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार भाजपाचा असेल : राजेश सावंत

0

रत्नागिरी : आगामी लोकसभेसाठी आमचा प्रवास सुरु झाला असून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. भाजपा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष बनवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दक्षिण रत्नागिरीची भाजपाची नुतन कार्यकारिणी जाहीर केली.

भाजपाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रत्नागिरी विधानसभा प्रभारी माजी आमदार बाळ माने, सतेज नलावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले की, वरिष्ठांच्या मान्यतेनेच ही कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. पुढील तीन महिने कार्यकारिणीतील सदस्यांच्या कामगिरीचे परीक्षण केले जाणार असून त्यानंतर त्यांना तीन वर्षाची मुदतवाढ दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यकारिणीतील सदस्यांबरोबरच जिल्हाध्यक्ष म्हणून आपलेही परिक्षण वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाचे कार्यकर्ते अगदी तळागाळात बुथ पातळीवर जाऊन काम करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाचे सर्व उपक्रम पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही जनतेमध्ये सहभागी होण्यावर विश्वास आहे. त्यामुळे जनतेचा पाठिंबाही मिळत असल्याचे सावंत यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये भाजपाला एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल विश्वास व आदर असणार्‍या कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यात व केंद्रात पक्षिय आघाडी असली तरी ती सत्तेमध्ये आहे. संघटना बांधणीचा अधिकार हा सर्वांनाच आहे. संघटनाबांधणीत कुठेही आघाडी नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपामध्ये रत्नागिरीत कोणतेही संघटनात्मक कुरघोडीचे राजकारण नाही. सर्व पदाधिकारी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतात. नव्या व जुन्या सर्वच पदाधिकार्‍यांना जिल्हा कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. त्यांच्या कामगिरीचे अवलोकन वरिष्ठ पातळीवरुन करण्यात येणार आहे. जुन्या कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांना बढतीही देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 16-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here