औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे अखेर बदलली; राज्य सरकारच्या राजपत्रात नोंद

0

मुंबई : मागील काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्यात आली. अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी या शहरांना नावे देण्यात आली. मात्र शहरांनतर आता जिल्ह्यांचीही नावे बदलण्यात आली आहेत.

त्यानुसार, संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव हे छत्रपती संभाजीनगर करण्यात येणार आहे. याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव आता धाराशिव करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने शुक्रवारी (15 सप्टेंबर) राजपत्र प्रकाशित काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलले. त्यामुळे यापुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल सात वर्षांनी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही असे सांगितले होते. पडताळणी झाली नसताना तुम्ही नावे कशी बदलली अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. त्यामुळे तूर्तास औरंगाबादचे नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव उस्मानाबाद जिल्हा असेच ठेवायचे ठरवले होते. ही प्रक्रिया पूर्ण करुन आम्ही विचार करु असे सरकारने सांगितले होते.

त्यानंतर शुक्रवारी सरकारकडून राजपत्र जारी करण्यात आले असून उस्मानाबाद आणि औरंगाबाद या संपूर्ण जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत.

यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते. पंरतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचे नाव बदललेले नव्हते. त्यामुळे शहरानंतर इतर नावे शुक्रवारी राज्य सरकारने राजपत्र जारी करुन बदलली.

आधी आता
औरंगाबाद विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग
औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा
औरंगाबाद उप-विभाग छत्रपती संभाजीनगर उप-विभाग
औरंगाबाद तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका
औरंगाबाद गाव छत्रपती संभाजीनगर गाव

आधी आता
उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा
उस्मानाबाद उप-विभाग धाराशिव उप-विभाग
उस्मानाबाद तालुका धाराशिव तालुका
उस्मानाबाद गाव धाराशिव गाव

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 16-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here