पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही पहिलाच आहे आणि पहिलाच राहील. विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे नवभारत ग्रुपच्या वतीने ‘नवभारत नवराष्ट्र महाराष्ट्र 1 कॉन्क्लेव्ह 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रबंध संपादक निमिष माहेश्वरी, युवराज ढमाले हे उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योगसमूहांचा आणि उद्योजकांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याचा नवभारत समूहाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. वाचकांशी बांधिलकी जपत नवभारतने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सगळे जग आता भारताकडे आश्वासकपणे पाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे जी 20 चे ‘डिक्लरेशन’ यशस्वी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकाराने आफ्रिकन युनियनचा जी 20 समूहात समावेश झाला.

चीनचे औद्योगिक प्राबल्य दिवसेंदिवस कमी होत असून भारताचे प्राबल्य वाढते आहे. जपानमध्ये तंत्रज्ञान आधारित उद्योगात आता नवा विचार रुजतो आहे. आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन पर्यंतही जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे असणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे ‘कॅपिटल’ बनले आहे. मुंबईत पायाभूत सुविधांची कामे आता वेगात सुरू आहे. ट्रान्स हार्बर लिंक क्रांतिकारक ठरणार आहे. पुण्यातील रिंगरोडमुळे उत्पादन क्षेत्रात मोठे बदल होतील. पुण्याजवळ नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे.

नागपूर आता लॉजिस्टिक कॅपिटल बनत आहे. समृद्धी महामार्गामुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी वाढली आहे. वाढवण बंदर सर्वात मोठे बंदर ठरणार असून भूमिपुत्र आणि मच्छीमार यांना विश्वासात घेऊनच येथे विकास करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियान ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान

जलयुक्त शिवार अभियानामुळे महाराष्ट्रातील भूजल पातळी वाढली असल्याचे केंद्रीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी कृषिपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज पुरवठा करता येणे शक्य होणार आहे. यामुळे कृषी उत्पन्नातही वाढ होईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 16/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here