नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) नेतृत्ववामुळे भारताने जगात पुन्हा एकदा नावलौकिक मिळवला आहे. अमेरिकेतील (America) मॉर्निंग कन्सल्टच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल सर्व्हेमध्ये, पीएम मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत.
पंतप्रधान मोदींना तब्बल 76 टक्के रेटिंग मिळालं आहे, जे जगातील अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त आहे.
लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर
ग्लोबर लीडर अप्रुव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील प्रसिद्ध नेत्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात मोदींनी (PM Modi) जगभरातील 21 नेत्यांना छोबीपछाड देत आपला नंबर अव्वल ठेवला आहे. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेर्सेट (Alain Berset) दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना पंतप्रधान मोदींच्या तुलनेत 12 टक्के कमी रेटिंग मिळालं आहे. विशेष म्हणजे या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांना 40% रेटिंग मिळालं आहे.
मोदींची निगेटीव्ह रेटिंगही सर्वात कमी
6 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान गोळा केलेल्या डेटामध्ये, जगातील नेत्यांबद्दल निगेटिव्ह अप्रुव्हल रेटिंगही (Disapproval Rating) घेण्यात आलं होतं. त्यातही मोदींचे अप्रुव्हल रेटिंग सर्वात कमी म्हणजे फक्त 18 टक्के आहे. निगेटीव्ह रेटिंग ही आकडेवारी आहे, ज्यामध्ये सर्वेक्षणात समाविष्ट असलेले लोक नेत्यांना नाकारतात किंवा नापसंत करतात. या यादीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडू (Justin Trudeau) यांना सर्वाधिक लोकांनी, म्हणजेच 58% लोकांनी नापसंत केलं आहे.
मॉर्निंग कन्सल्ट ही एक पॉलिटिकल इंटेलिजेन्स रिसर्च फर्म आहे. यात जगभरातील 22 नेत्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यू सिओक-युल आणि झेक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पेट्र पावेल यांना सर्वात कमी, म्हणजेच फक्त 20% रेटिंग मिळालं आहे.
मागील काही वर्षांपासून मोदी अव्वल स्थानावर
अलीकडच्या सर्वेक्षणांमध्ये, पंतप्रधान मोदी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. पीएम मोदींनी अलीकडेच जगातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत, जिथे त्यांना जागतिक नेत्यांकडून खूप आदर मिळाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या G20 शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं आणि भारताचं जगभरातून कौतुक होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या जागतिक नेत्यांनीही रशिया-युक्रेन युद्धासह इतर जागतिक समस्यांवर संयुक्त सहमती आणि निवेदन जारी केलं, त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची जगभरात चर्चा होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 16-09-2023
