तातडीच्या रुग्णांची वाहतूक आता ड्राेनद्वारे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

पुणे : देशात दरवर्षी सुमारे ५ लाख रस्ते अपघात हाेत असून, अशा दुर्घटनेत जवळपास दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे महामार्ग, रस्त्यांना संलग्न वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देणार आहे.

प्रत्यारोपणासाठीचे अवयव विमानतळावरून वेगाने रुग्णालयांपर्यंत पोहोचावेत यासाठी तामिळनाडूमध्ये ड्रोन पोर्ट तयार करण्यात येत आहे. आपल्याकडेही असा ड्रोन पोर्ट तयार करता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक युरोलॉजी सेंटरचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी युरोकुलचे संचालक डॉ. संजय कुलकर्णी आणि डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, म्हैसकर फाउंडेशनच्या सुधा म्हैसकर, जयंत म्हैसकर आणि आमदार भीमराव तापकीर व्यासपीठावर उपस्थित होते.

टीव्ही हप्त्यांवर मिळू शकताे तर रस्ते हप्त्यांवर का बांधले जाऊ नयेत, असा प्रश्न मला पडला आणि त्यातूनच टाेलच्या रस्त्यांची निर्मिती सुरू झाली, असेही गडकरी म्हणाले. वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी रस्ते, उड्डाणपुलांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर काम केले जात आहे. या रस्त्यांवर दुमजली महामार्ग बांधण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वी कोणत्याही उपचारांसाठी मुंबई किंवा दिल्लीला जावे लागायचे. आता पुण्यातही अद्ययावत वैद्यकीय उपचार मिळणे शक्य झाले आहे. यासाठी ६७० रुग्णालयांचे काम सुरू करणार आहे. तसेच २७० ठिकाणी हेलिपोर्ट बांधले जाणार आहेत. डॉ. संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी रोबोटिक युरोलॉजी सेंटरची माहिती दिली. बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे डॉ. राजेश देशपांडे यांनी आभार मानले.

एमआरआय केवळ पंधराशे रुपयांत :
मी रस्ते बांधताे हे लाेकांना माहीत आहे; पण, मी ९० टक्के सामाजिक कार्य करताे. आतापर्यंत ४० हजार जणांचे हृदयाचे ऑपरेशन माेफत करून दिले. हजाराे लाेकांना पाय लावून दिले. माझ्या आईच्या स्मरणार्थ एक माेठे सेंटर उभे करत आहे. सध्या एमआरआय करायचा म्हटला की पंधरा हजार रुपये लागतात. परंतु, या सेंटरमध्ये ताे पंधराशेला, सीटी स्कॅन ६०० रुपयांत तर पाचशे रुपयांत पॅथाॅलाॅजी करणार असल्याचे डॉ. संजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 16-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here