Maharashtra Politics: सत्तासंघर्षाबाबत दोन याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी

0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (18 सप्टेंबर) महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. दोन्ही प्रकरणं ही शिवसेनेशी संबंधित आहेत.

शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narevekar) यांच्याविरोधात दाखल याचिकेबाबतही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांचे क्रमांक अनुक्रमे 18 तसंच 19 असे आहेत.

शिवसेनेच्या दोन मोठ्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार असल्याने याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. त्याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरही आज सुनावणी होईल. आमदारांच्या निलंबनासंदर्भात अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात
दरम्यान सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. आज या याचिकेवर सुनावणी होईल.

विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी गेल्या वर्षी बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांना लवकर घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यामध्ये पडणार का, या सुनावणीत नेमकं काय होणार, कोर्ट काही निर्देश देणार का याची उत्सुकता लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here