गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात १४५० एसटी बसेस दाखल

0

रत्नागिरी : उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबईकरांचे आगमन सुरू झाले आहे. जिल्ह्यात गणेशमूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने नोकरी- व्यवसायासाठी परगावी स्थायिक असलेले चाकरमानी गावाकडे येऊ लागले आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांत १,४५० एसटी गाड्या दाखल झाल्या असून, सोमवारी १,०५० जादा गाड्या येणार आहेत.

दरवर्षी मुंबई व उपनगरातून कोकणात जादा गाड्या सोडण्यात येतात. शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने जोडून सोमवारची रजा टाकून भाविक गावी येऊ लागले आहेत. भाविक मोठ्या संख्येने उत्सवासाठी गावी येणार असल्याने उत्सवासाठी गावी येणार असल्याने गाड्यांची संख्या वाढली आहे. गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येणार असल्याने रत्नागिरी विभागातर्फे दुरुस्ती पथके, गस्ती पथके, क्रेन सज्ज ठेवण्यात आली आहेत.

कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा व हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्ती पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्ती पथके उपलब्ध केली जाणार आहेत. चिपळूण येथे क्रेन ठेवण्यात येणार आहे. विभागात तीन अद्ययावत ब्रेकडाऊन व्हॅन असून, महामार्गावर तैनात ठेवली जाणार आहेत. भरणे नाका, चिपळूण, हातखंबा तिठा येथे ब्रेकडाऊन व्हॅन उपलब्ध असणार आहेत. संगमेश्वर आगारात दुरुस्ती पथक उपलब्ध केले जाणार आहे. जादा गाड्या घेऊन येणारे चालक अन्य जिल्ह्यांतील असल्याने मार्ग दाखविण्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले असून, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पथकही महामार्गावर कार्यरत आहे. जिल्ह्यात शनिवारपासून जादा गाड्या येण्यास प्रारंभ झाला आहे.

सर्वाधिक १२०० गाड्या रविवारी दाखल झाल्या असून, शनिवार व रविवार दाखल झालेल्या गाड्यांचा आकडा १,४५० वर गेला आहे. दि. १८ रोजी १०५० जादा गाड्या येणार आहेत. रत्नागिरी विभागातील नऊ आगारांतही जादा गाड्या येणार आहेत. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपाहारगृहातून पुरेसे खाद्यपदार्थ व्यवस्था, प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. परतीसाठी गौरी गणपती विसर्जनापासून (दि. २३ सप्टेंबर) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २००० जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे.

गणेशभक्तांचे आगमन सुरू झाले असून, मंडणगड ते राजापूर आगारात जादा गाड्या दाखल होत आहेत. प्रत्येक आगाराला याबाबत सूचना दिल्या आहेत. गणेशभक्तांसाठी एसटीकडून परतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठीचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. -प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here