नव्या संसद इमारतीत जाण्याची प्रक्रिया खूप भावनिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण करत आहे. ७५ वर्षांचा संसदीय प्रवास पुन्हा एकदा लक्षात ठेवण्याची आणि नव्या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी ते प्रेरणादायी क्षण आणि इतिहासातील महत्त्वाचे क्षण आठवून पुढे जाण्याची ही संधी आहे.

या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर या इमारतीला संसद भवन म्हणून मान्यता मिळाली. ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता. मात्र या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा पैसा, घाम आणि कष्ट आहे, हे आपण अभिमानाने सांगू शकतो, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जुन्या संसद इमारतीचं संग्रहालय करण्यात येणार आहे. संसदेचा इतिहास सामान्य जनतेला सदैव पाहता येणार आहे. नव्या संसद इमारतीत जाण्याची प्रक्रिया भावनिक असल्याचं सांगत नरेंद्र मोदी भाषण करताना भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

आमच्या सर्व आठवणी इथे जोडल्या आहेत. आपल्या सर्वांच्या आठवणी या जुन्या संसदेत आहेत. आपला अभिमान देखील त्याच्याशी जोडलेला आहे. या ७५ वर्षांत आपण या सभागृहात अनेक घटना पाहिल्या आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो आणि पहिल्यांदा खासदार म्हणून प्रवेश केला तेव्हा स्वाभाविकपणे या संसद भवनात मी माथा टेकवला आणि आदरांजली वाहिली होती, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. जसजसा काळ बदलला, तसतशी आपल्या घराची रचनाही बदलत गेली आणि अधिक समावेशक होत गेली. संसदेत सुरुवातीला महिलांची संख्या कमी होती, पण हळूहळू माता-भगिनींनीही या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे. या संपूर्ण कालावधीत साडेसात हजारांहून अधिक प्रतिनिधींनी दोन्ही सभागृहांना हातभार लावला आहे. या काळात सुमारे ६०० महिला खासदारांनीही योगदान दिले असल्याची माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. संसदेचे हे विशेष अधिवेशन छोटं असले तरी खूप महत्वाचे आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. अधिवेशन छोटं आहे. त्यामुळे विरोधकांनी सहकार्य करावं. रडगाणं गाण्यासाठी नंतर बराच वेळ आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केली. २०४७ पर्यंत देशाला विकसित देश बनवायचे आहे. त्यासाठी येणाऱ्या काळातील सर्व निर्णय नवीन संसद भवनात घेतले जातील, असं सूचक वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच चंद्रावर मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकतोय. तसेच जी-२० परिषद यशस्वीरित्या पार पडली. भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनला असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले.

सर्व खासदारांचे ग्रुप फोटो काढले जाणार-

लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व ७९५ सदस्य (लोकसभेचे ५४५ खासदार आणि राज्यसभेचे २५० खासदार) मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सामूहिक छायाचित्रासाठी जमतील. पहिल्या फोटोत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतील. दुसऱ्या फोटोत फक्त लोकसभा सदस्य आणि तिसऱ्या फोटोमध्ये फक्त राज्यसभेचे सदस्य असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here