रत्नागिरी, मुंबई, पुणे, पालघर येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन

0

मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेच लोकांचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे माध्यम आहे. पारंपारिक कला व सांस्कृतिक ठेवा जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महोत्सवा दरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार व समाजमाध्यम प्रभावक तसेच विदेशी वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांना मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच रत्नागिरीतील गणेश दर्शन तसेच सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सदर महोत्सवांतर्गत गेटवे ऑफ इंडिया येथे श्री गणेशाच्या विविध स्वरुपांवर केंद्रीत विशेष सांस्कृतिक केंद्रांची उभारणी, वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन, गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शन मॅपींगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राचे पारंपारिक आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन घडविणारे वारली कलेचे कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तुचे कलादालन, पारंपारिक कला व लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम 10 दिवसीय गणेशोत्सव महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्यटनात वाढ : प्रधान सचिव राधिका रस्तोगी
गणेशोत्सव या सणाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा अनेक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करत असतो. आपण आपली संस्कृती या महोत्सवाच्या माध्यमातून इतरांना सांगू शकतो. आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि सांस्कृतिक जाणकारांची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राच्या विशाल आणि दहा दिवस चालणाऱ्या या गणेश महोत्सवामध्ये गणेश भक्त, पर्यटन प्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती रस्तोगी यांनी केले केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:45 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here