दाभोळ खाडीत परचुरी-फरारे फेरीबोट सेवा सुरू

0

रत्नागिरी : सुवर्णदुर्ग शिपिंग व मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमार्फत दाभोळ खाडीतील फरारे परचुरी फेरीबोट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

दापोली तालुक्यातील फरारे ते गुहागर तालुक्यातील परचुरी फेरीबोट सेवेचे उद्घाटन मेमध्ये झाले होते. ही सेवा पावसाळ्यामुळे बंद ठेवण्यात आली होती. आता ती सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील खाडी किनारपट्टीकडील गणेशभक्तांना आंबेत, मंडणगड, दापोली, दाभोळमार्गे जाण्याची विनंती केली जाते. त्यामुळे दाभोळच्या फेरीबोटीवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत होत्या. आता फरारे-परचुरी फेरीबोट सेवा सुरू झाल्याने गुहागर तालुक्यासह चिपळूण तालुक्यातील रामपूर, मार्गताम्हाणे, ओमळी, मुर्तवर्डे, वहाळ आदी परिसरात जाणाऱ्या गणेशभक्तांना दाभोळ खाडी ओलांडण्याचा नवा पर्याय मिळाला आहे.

मुंबईकडून मंडणगडमार्गे दापोलीत आल्यावर खेड रस्त्यावरील वाकवली फाट्याला आत शिरून फरारे येथे पोहोचले की, फेरीबोटीने गुहागर तालुक्यातील परचुरी गावात येता येते. तेथून तळवलीमार्गे गुहागर-विजापूर महामार्गाचे अंतर केवळ २० किलोमीटर आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील गणेशभक्त आगरदांडा-दिघी, आंबेत-म्हाप्रळ, वेश्वी-बागमांडले, दाभोळ धोपावे किंवा फरारे-परचुरी व तवसाळ-जयगड या फेरीबोट मार्गांचा वापर करून वेगाने कोकणात पोहोचता येऊ शकते. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या फेरीबोट सेवा दाभोळ- धोपावे, जयगड- तवसाळ, वेश्वी-बागमांडले, आंबेत- म्हाप्रळ, आगरदांडा- दिघी या मार्गावर यशस्वीपणे सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here