रत्नागिरी : समुद्र किनारपट्टीलगत भूमिगत वाहिन्यांसाठी ४५० कोटीचा निधी मंजूर

0

रत्नागिरी : महावितरणची वीज यंत्रणा खुल्या आसमंतात असल्याने वादळ, वारे, पाऊस याचा जोरदार तडाखा सर्वात प्रथम महावितरणच्या यंत्रणेला बसतो व यंत्रणा कोलमडते. विजपुरवठा खंडित होतो.

यावर पर्याय म्हणून भूमिगत वीज वाहिनीच्या प्रस्तावाला शासनाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरानंतर आता जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टी लगतच्या गावांमध्येही भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातंर्गत ४५० कोटी रूपये मंजूर झाले आहेत.

रत्नागिरी शहर व परिसरात ९४ कोटी निधीतून भूमिगत वीज वाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरापाठापोठ आता समुद्र किनारपट्टी लगतच्या गावातूनही भूमिगत वीज वाहिन्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. रत्नागिरी ग्रामीण, राजापूर, दापोली, मंडणगड या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात, वादळामुळे कोलमडणारी वीज यंत्रणा तरी सुरक्षित राहणार असून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सुरू राहणार आहे.

यापूर्वी झालेल्या फयान, निसर्ग, तोक्ते वादळामुळे महावितरणचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विजेचे खांब, वाहिन्या तुटून वीजयंत्रणा ठप्प झाली होती. वीज यंत्रणा उभारण्यासाठी महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागलेण जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील महावितरणच्या टीमची मदत घेत वीज यंत्रणा पुन्हा उभारण्यात येवून वीज पुरवठा सुरळित करण्यात आला. त्यासाठी श्रम, पैसा, वेळ खर्च झाला. यामुळे महावितरणने भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. केंद्र शासनाने भूमिगत वाहिन्यांच्या प्रस्तावाला मान्यता दर्शविली आहे. लवकरच निविदा प्रक्रियेची पूर्तता होणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी सागरी किनारपट्टीवरील गावांची निवड करण्यात आली असून या गावातील विजेची समस्या मार्गी लागणार आहे.

रत्नागिरी शहर व परिसरातील भूमिगत वीज वाहिन्यांची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. जिल्ह्यातील राजापूर ते मंडणगड पर्यंतच्या समुद्रकिनारपट्टी लगतच्या गावात भूमिगत वीज वाहिनीच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळाली असून निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांना प्रारंभ होणार आहे. – स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here