रत्नागिरी : हरचिरीत १२ कोटीचे नवीन धरण मंजूर

0

रत्नागिरी : तालुक्यातील हरचिरी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नवीन धरण मंजूर झाले आहे.

सुमारे १२ कोटीची हे धरण असून, गळती लागलेल्या जुन्या धरणाच्या खालील बाजूला नवीन धरण बांधले जाणार आहे. पहिल्या धरणाची साठवण क्षमता ०.२७९ दशलक्ष घनमीटर होती. नवीन धरणामुळे सुमारे १०० एमएलडीहून अधिक पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या ग्राहकांची भविष्यातील पाणी टंचाईची चिंता मिटणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. जुन्या धरणातील गेल्या 30 ते 35 वर्षे गाळच काढला गेलेला नाही. गाळ साठून या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. तसेच धरणाला गळती असल्याने त्यावर खर्च करण्याऐवजी या धरणाच्या पुढच्या बाजूला काही अंतरावर हे नवीन धरण बांधले जाणार आहे. एमआयडीसीने त्याबाबतचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी सादर केला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याचा पाठपुरावा करून धरणासाठी १२ कोटीचा निधी मंजूर केला आहे. जुन्या धरणाच्या खालच्या बाजूला पन्नास मिटर अंतरावर हे नवे धरण बांधले जाणार असून त्याची भिंत चार मीटर उंचीची असेल. त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होणार आहे. दरवर्षी मे महिन्यामध्ये पाण्याचे नियोजन करावे लागते. हा प्रश्न नव्या धरणामुळे सुटणार आहे.

एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर पद्धतीचे पाच बंधारे आहेत. काजळी नदीवर ही धरणे उभारली आहेत. घाटीवळे, आंजणारी, असुर्डे, निवसर आणि हरचिरी अशी त्यांची नावे आहेत. एमआयडीसीकडून कुवारबाव, नाचणे, कर्ला, मिर्‍या, पोमेंडी बुद्रुक, चिंद्रवली, मिरजोळे आणि शिरगाव यांसह ९ ग्रामपंचायती, रत्नागिरी पालिकेला आणि एमआयडीसीतील ७८० प्लॉटधारक, उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतींना प्रतिदिन 1.8 एमएलडी आणि पालिकेला दीड एमएलडी प्रतिदिन पाणीपुरवठा होतो; परंतु मुख्य धरण असलेल्या हरचिरी धरणाला मोठी गळती आहे. तसेच गेल्या 30 वर्षांपासून त्यातील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे हा नवीन धरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.

रस्त्यांसाठी ६ कोटी
एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामांबरोबर आता चिंद्रवली आणि टिके गावातील रस्त्यांनाही ६ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. उद्योगमंत्री सामंत यांच्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचे रस्ते चकाचक होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:52 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here