टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा 2021 पर्यंत

0

मुंबई : कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती आज टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुंबईतील मुख्यालयात मुख्य प्रशिक्षकासह गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि फलंदाज प्रशिक्षकासाठीही मुलाखती सुरू झाल्या आहेत. पण, सर्वांचे लक्ष लागले आहे ते मुख्य प्रशिक्षक कोण असेल, याकडे. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवानंतर रवी शास्त्रींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे या पदावर ते कायम राहतात की नवा चेहरा निवडला जातो, हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. पण, नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंतच असणार आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. IANSशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. ”मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मुख्य प्रशिक्षक निवडीची पुन्हा प्रक्रिया पार पडेल. यासह सपोर्ट स्टाफलाही ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपर्यंतच करार देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वांच्या स्पर्धा लक्षात घेता, नव्यानं मुलाखती होतील.” ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्याकडून शास्त्री यांना कडवी लढत मिळू शकते. 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत यांच्या अर्जावरही गांभीर्याने विचार होऊ शकतो. तसेच, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले आहेत. पण, रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे. कर्णधार विराट कोहलीनंही त्याचे पारडे शास्त्रींच्या तराजूत टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here