चीनच्या हुवाई कंपनीवर अमेरिकेची नाराजी, तर मुकेश अंबानींच्या जिओचे कौतुक

वॉशिंग्टन : रिलायन्स जिओच्या कारभारासंदर्भात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ यांनी कौतुक करतानाच चीनमधील हुवाई कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चिनी कंपनी असणाऱ्या हुवाईबरोबर काम न करण्याचा निर्णय घेणाऱ्या टेलीकॉम क्षेत्रातील कंपन्यांबद्दल अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रीमंडळातील सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी एक असणाऱ्या पॅम्पिओ यांनी भाष्य केले. पॅम्पिओ यांनी यासंदर्भात ट्विट करताना जगभरातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी हुवाईविरोधात भूमिका घेतली असून आता अनेकजण फाइव्ह जी सेवा देणाऱ्या नव्या कंपन्यांकडे वळताना दिसत असल्याचे नमूद केले आहे. अमेरिकेमध्ये सेवा पुरवणाऱ्या हुवाई कंपनीचे चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आणि चिनी लष्कराशी संबंध असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकारने केला आहे. सध्या अनेकजण विश्वासार्हता असणाऱ्या फाइव्ह जी सेवा पुरवणाऱ्यांकडे जात आहेत. जगातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या असणाऱ्या टेलीफोनीका, ऑरेंज, जिओ, टेल्स्ट्रा आणि इतर अनेक कंपन्या पारदर्शक कारभार करत असल्याचे पॅम्पिओ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हुवाईबरोबर व्यवसाय करण्यास अनेक कंपन्या आता नकार देत असल्याचेही पॅम्पिओ यांनी म्हटले आहे. चीनमधील सत्ताधारी पक्षासाठी ही कंपनी हेरगिरीचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हुवाई आणि इतर २० चिनी कंपन्या या चिनी सैन्याच्या मालकीच्या किंवा त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या मालकीच्या असल्याचे ट्रम्प सरकारने बुधवारी म्हटले आहे. अमेरिकन वृत्तपत्रांनी यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. जगभरातील देशांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन हुवाई कंपनीबरोबर व्यवहार करुन नये, असे आवाहन ट्रम्प यांच्या सरकारने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here