भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. ९ ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांचे पथक सातत्याने अरूण जेटली यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. परंतु आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे.
आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद एम्समध्ये जाऊन अरूण जेटलींची भेट घेतील. अरूण जेटलींनी एम्समध्ये दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांची भेट घेतली होती. तसेच आता राष्ट्रपतीही भेट घेणार असल्याने त्यांची प्रकृती आणखीच खालावली असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुजरातचे पर्यटन मंत्री आणि भाजपा नेते वासन अहिर यांचा उतावळेपणा चर्चेचा विषय बनला आहे. १० ऑगस्ट रोजी कच्छमध्ये आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी जेटलींना चक्क श्रद्धांजली वाहून टाकल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुजरातच्या पर्यटनमंत्र्यांनी या कार्यक्रमात जेटलींना केवळ श्रद्धांजलीच वाहिली नाही तर तिथे उपस्थित शेतकऱ्यांना आणि मान्यवरांना दोन मिनिटांचे मौनही बाळगण्यास सांगितले. कच्छच्या मांडवी तालुक्यातील बिदाद गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
