रत्नागिरी पोलिसांच्या सायबर सेलमुळे वाचला तरुणाचा जीव

रत्नागिरी : ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या करायला निघालेल्या एका तरुणाचा जीव पोलिसांच्या सायबर सेलमुळे वाचला. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांनी ही कामगिरी बजावली. ऑनलाइन फसवणुकीमध्ये लाखभर रूपये गमावल्याच्या नैराश्यामधून एका तरूणाने जीव देत असल्याचा विचार सुसाइड हेल्पलाईनला रात्री साडेबारा वाजता बोलून दाखवला. तो फोन खेड येथून आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला. काही क्षणांतच रत्नागिरी पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याला प्रतिसाद मिळाला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांच्या माध्यमातून रत्नागिरी पोलिसांचा सायबर सेल सतर्क झाला. सायबर सेलला फोन करणाऱ्या तरुणाचे ठिकाण श्री. शेख यांनी शोधून दिले. त्याबरोबर सायबर सेलने त्या व्यक्तीचे घर शोधले, त्याला तत्काळ फोन केला. त्याच वेळी खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना त्याची माहिती देण्यात आली. सुवर्णा पत्की यांनी पीएसआय शेणोलीकर, हवालदार साळवी आणि कॉन्स्टेबल धाडवे, येलकर यांना त्या तरुणाच्या घरी पाठवले.
एकीकडे सायबर सेलचे श्री. गमरे फोनवरून त्या तरुणाचे समुपदेशन करत होते. त्याचवेळी खेड पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तरुणाची एक लाखाची ऑनलाइन फसवणूक झाली होती. ते पैसे त्याने बहिणीच्या लग्नासाठी ठेवले होते. मात्र फसवणूक झाल्यानंतर तो निराश झाला होता आणि त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. रत्नागिरी पोलिसांचा सोशल मीडिया, सायबर सेल, खेड पोलीस यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका तरुणाचा जीव वाचला. त्या तरुणाला ऑनलाइन फसवणूक प्रकारणी तक्रार देण्यास सांगण्यात आले असून त्याला संपूर्ण मदतीचे आश्वासन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिले. तर संकटाच्या प्रसंगांमध्ये नागरिकांनी खचून न जाता आपल्या समस्येचा मार्ग शोधावा आणि गरज असल्यास पोलिसांशी संपर्क करावा. पोलीस नेहमी आपल्या मदतीसाठी पुढे येतील, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:37 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here