कै.मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये गायत्री दामले, अनिल कासारे आणि सिद्धी नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावलें आहेत. यावर्षीचा राज्यस्तरीय गटातील सांघिक चषक पुन्हा एकदा देव घैसास किर आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयाने पटकावला आहे.
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी कै. मृणाल हेगशेटये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. 1983 पासून ही स्पर्धा भरली जात असून या स्पर्धेला महाराष्ट्रात एक वेगळेच नावलौकिक मिळाले आहे. यांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी सहभाग घेत असतात. त्यांच्यासाठी ही स्पर्धा दर्जेदार व्यासपीठ ठरली आहे.
सुरुवातीला नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. तालुकास्तरीय गटामध्ये गायत्री दामले [फाटक हायस्कूल] हिने प्रथम, यशदा कुलकर्णी [पटवर्धन हायस्कूल] हिने द्वितीय तर चिन्मयी राऊत [नवनिर्माण हाय] हिने तृतीय क्रमांक पटकावला. श्रावणी पारकर (नवनिर्माण हाय रत्ना.) आणि सोहनी जोगळेकर (फाटक हायस्कूल रत्ना.) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
जिल्हास्तरीय गटामध्ये आर्यन कासारे (तू.पू शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा ), प्रिया हळदणकर (वि.स.कनिष्ठ महाविद्यालय, रत्ना.), सिमरन शेख (तू.पु. शेटे कनिष्ठ महाविद्यालय) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. हर्ष नागवेकर (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय) व विधी सुर्वे ( भाई हेगशेटये कॉलेज, संगमेश्वर) यांना उत्तेजनार्थ स्पर्धक म्हणून गौरवण्यात आले.
स्पर्धेतील महत्त्वाच्या राज्यस्तरीय गटामध्ये देव घैसास किर आर्ट्स, कॉमर्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी नार्वेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. राम नारायण रुईया महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रेयस सनगरे याने द्वितीय क्रमांक तर देव घैसास किर आर्ट्स, कॉमर्स महाविद्यालयाचा कौस्तुभ फाटक याने तृतीय क्रमांक संपादन केला. उत्तेजनार्थ म्हणून संकेत पवार (शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय,खरवते) व आराधना मंडळ (नवनिर्माण महाविद्यालय रत्नागिरी) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
माजी न्यायमूर्ती आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्कर शेटये, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेटये, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य डॉक्टर वामन सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा. वैभव कानिटकर, प्रा.रूपाली आणेराव, पत्रकार अनघा निकम, प्रा. विनोद मिरगुले, रोहन अनापुरे आणि सिद्धिकी यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.
