रत्नागिरी : तुम्ही जर मूळचे रत्नागिरी जिल्हावासीय आहात; पण नोकरी व्यवसायानिमित्त इंग्लंड, अमेरिकेत राहात असाल किंवा अरब राष्ट्रांमध्ये वास्तव्यास आहात अथवा जगाच्या कानाकोपर्यात कुठेही असाल आणि अशावेळी ‘आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे’ हे शब्द कानी पडले तर? कदाचित तुम्ही तुमच्याच घरी आहात, असा भास होईल. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून प्रसार भारतीने रत्नागिरी आकाशवाणी केंद्राला डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थान देत ऑनलाईन केल्याने हे शक्य झाले आहे. news on air या मोबाईल अॅपवर गुरुवारी स्वातंत्र्य दिनापासून ही सुविधा औपचारिकपणे उपलब्ध झाली असली तरी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम या अपॅवर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून लाईव्ह मिळू लागले आहेत. रत्नागिरी येथील आकाशवाणी केंद्रामार्फत 1143 किलो हर्टझ्वर प्रसारित होणार्या कार्यक्रमांचा लाभ रत्नागिरी, सिंधुदुर्गासह लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात घेता येतो. जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या केंद्रांचे प्रसारण सुस्पष्ट ऐकता येत नव्हते. काही वर्षांपासून या केंद्रामार्फत 101.5 या फ्रिक्वेंसीवर एफ. एम. वाहिनीचे कार्यक्रमही ऐकता येऊ लागले आहेत. आता 1143 किलो हर्टर्झ या मध्यम लहरी वाहिनीचे कार्यक्रम प्रसार भारतीकडून ऑनलाईन करण्यात आले आहे. यामुळे तुम्ही जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रहिवासी असाल किंवा या केंद्राचे चाहते असाल तर जगाच्या काना -कोपर्यातून आता कुठूनही तुम्हाला रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकता येतील. रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम सकाळी 5.55 ते दुपारी 3.05 तसेच सायंकाळी 5.30 ते रात्री 11.10 या वेळेत मोबाईल अॅपवर रेडिओ संचाशिवाय ऐकता येणार आहेत. केंद्राच्या अखत्यारितील श्रोत्यांना देखील यामुळे रेडिओ संचाजवळ थांबून कार्यक्रम ऐकण्याची गरज उरलेली नाही. जिथे कुठे मोबाईल नेटवर्क उपलब्ध आहे, तिथे मोबाईलवरच हेडफोन न वापरता देखील रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम ऐकता येणे शक्य झाले आहे. देशभरातील कुठल्याही आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रमांसह ‘डीडी इंडिया लाईव्ह’ तसेच ‘डीडी न्यूज या लाईव्ह’ टीव्ही वाहिन्यांचा देखील लाभ घेता येणे शक्य झाले आहे.
