जिल्हा फोटो व्हिडिओ संस्था पूरग्रस्तांना देणार मदत
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेतर्फे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा मनोरंजनात्मक कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. दोन दिवसांच्या सर्व कार्यक्रमातून जमलेली काही रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. पुरामध्ये ज्या छायाचित्रकारांचे नुकसान झाले त्यांना काही निधी दिला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष अजय बाष्टे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्था जोमाने काम करत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी छायाचित्रकार या संघटनेशी निगडित आहेत. छायाचित्रणातील नवनवी आव्हाने संस्था पेलत आहे. छायाचित्रण दिन साजरा करतानाच सामाजिक भान ठेवण्याचे काम संस्था करते. गतवर्षी पावस येथील अनुसूया आनंदी वृद्धाश्रमालाही मदत दिली होती. यंदा पूरग्रस्तांना निधी दिला जाणार आहे.
छायाचित्रण दिनानिमित्त लहान मुलांच्या छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन उद्यापासून (ता. 18) दोन दिवस स्वा. सावरकर नाट्यगृहात सुरू राहील. प्रदर्शनास्थळी पूरग्रस्त निधी जमवण्याच्या दृष्टीने एक बॉक्स ठेवण्यात येणार असून जमणारी रक्कम आणि कार्यक्रमातील काही भाग अशी रक्कम पूरग्रस्त निधी म्हणून पोहोच करणार असल्याचेही बाष्टे यांनी सांगितले. कार्यक्रमाकरिता संस्थेतील सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत.
कार्यक्रमांची रूपरेषा अशी- 18 ऑगस्टला सकाळी 8.30 वाजता किडस् फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन, स्थळ – स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी, 9 वाजता जलतरण स्पर्धा, स्थळ- शासकीय जलतरण तलाव, 11.30 वाजता क्रिकेट स्पर्धा, दुपारी 3 वाजता कॅरम स्पर्धा, स्थळ छत्रपती शिवाजी स्टेडियम. 19 ऑगस्टला सकाळी 10 वाजता कॅमेरा पूजन व गुणगौरव, विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, स्थळ- सावरकर नाट्यगृह रत्नागिरी. सकाळी 11 छायाचित्रकार बंधूंच्या समस्यांवर चर्चासत्र, दुपारी 12 वाजता वृक्षारोपण, सायंकाळी 4 वाजता बक्षीस समारंभ व संगमेश्वरी बाज मनोरंजनाचा कार्यक्रम.
