येत्या दोन दिवसांत आंबोली घाट मार्ग सुरू करण्याचे आदेश

0

सावंतवाडी : येत्या दोन दिवसांत आंबोली घाट घाट मार्ग सुरू करण्याचे आदेश   पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. यानुसार  येत्या दोन दिवसांत या घाटमार्गातून एस.टी. प्रवासी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती सा. बां. चे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी दिली. तर शिरशिंगे, असनिये आणि दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथे झालेल्या भूस्खलनाचे पुन्हा एकदा तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या भूगर्भ तज्ज्ञांमार्फत हे सर्वेक्षण होणार असून, दोन दिवसांत केंद्र शासनाचे हे तज्ज्ञ सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहेत. गेल्या दहा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने आंबोली धबधब्या समोरील घाट रस्ता खचल्याने आंबोली घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.  सध्या केवळ दुचाकी व चारचाकी वाहतूक येथून सुरू आहे. मात्र, एस.टी. वाहतूक बंद झाल्याने कोल्हापूर, बेळगाव कडे जाणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच आंबोली, गेळे, चौकुळ या गावांचा सावंतवाडीशी संपर्क तुटला आहे.  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली घाटातून तत्काळ एसटी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने घाटमार्गाची दुरूस्ती करण्याचे आदेश सा. बां. विभागाला दिले होते. यानुसार सा. बां.च्या अभियंत्यांनी धबधब्याच्या बाजूने रस्त्याची रुंदी वाढवून घाटमार्ग एसटी वाहतुकीसाठी सुरक्षित केला आहे. याबाबतचे अंतिम काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात आंबोली घाटातून एसटी वाहतूक सुरू होईल, असा विश्‍वास सा. बां.चे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी व्यक्‍त केला.  आंबोली घाटातील धबधब्याच्या बाजूने असलेला मोठा दगड फोडून तेथे रस्ता रुंद केल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील  अनेक गावांत झालेले भूस्खलन झाले आहे. शिरशिंगे येथे जमिनीला पडलेले तडे , असनिये-घारपी मार्गावर तसेच झोळंबे येथे  कोसळलेल्या दरडी याचे  स्थानिक भूगर्भ तज्ज्ञांनी  सर्वेक्षण केले आहेे.  शिरशिंगे, झोळंबे येथे झालेले भूस्खलन धोकादायक असल्याचे या तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर सखोल सर्वेक्षण केंद्र सरकारच्या भूगर्भ तज्ज्ञांमार्फत होणार आहे. येत्या दोन दिवसात हे तज्ज्ञ सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहेत. दरम्यान, असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आलेल्या कणेवाडी  ग्रामस्थांनी आपल्याला घरी पाठविण्याची मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून नव्याने सर्वेक्षणाचा निर्णय झाल्याने या ग्रामस्थांची घर वापसी लांबणीवर पडली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here