लांजा : तालुक्यातील कोंड्ये बौद्धवाडी येथील विवाहितेने घराच्या वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. प्रेरणा प्रवीण कांबळे (वय 35, रा. कोंड्ये) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. राहत्या घराच्या शेजारीच प्रेरणा व पती प्रवीण यांनी नव्याने घरकुल बांधले असून घरकुलात सध्या कोणीही राहत नसे. मात्र, गुरुवारी पहाटेपासून घरात प्रेरणा कुठेच दिसून न आल्याने त्यांची लहान मुलगी आईचा शोध घेऊ लागली. आईला पाहण्यासाठी त्यांची मुलगी नवीन घरकुलामध्ये गेली असता, प्रेरणा घराच्या वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्या क्षणी मुलीने केलेला आरडा-ओरडा लक्षात घेता घरातील सर्व नातेवाईकांनी नव्या घरकुलाच्या दिशेने धाव घेतली. गळफास घेतलेल्या प्रेरणा हिला वाचविण्यासाठी प्रयत्न केला गेला. मात्र तत्पूर्वी प्रेरणाचा मृत्यु झाला होता.
